ममुराबाद रस्त्यावर म्हाडाकडे ३१ गुंठे जमीन हस्तांतरित; १४४ घरांसाठी सहा मजली इमारतीचा मार्ग मोकळा

 

जळगाव समाचार | ८ सप्टेंबर २०२५

जळगाव शहरातील गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा मिळाला असून ममुराबाद रस्त्यावर असलेली ३१ गुंठे शासकीय जमीन म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेवर पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत १४४ घरकुलांसाठी सहा मजली इमारत उभारण्याची योजना तयार केली जात आहे. सध्या हा प्रकल्प तांत्रिक मान्यतेच्या टप्प्यात असून मान्यता मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. जळगाव शहरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने घरकुल बांधकामास मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्याचा विचार करून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक येथील गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडे गट क्रमांक ४२०/अ चे ०.१५ गुंठे आणि गट क्रमांक ४२१/अ चे ०.१६ गुंठे असे एकूण ३१ गुंठे क्षेत्र हस्तांतरित करण्याची प्रक्रिया मार्च महिन्यात पूर्ण केली.

घरकुल योजना लाभार्थ्यांसाठी वरदान ठरणार
म्हाडाच्या या उपक्रमामुळे कमी उत्पन्न गट तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध होणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे शहरातील असंख्य गरजू कुटुंबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. म्हाडाची इमारत उभी राहिल्यानंतर नागरी वसाहतींच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या जागेचा पूर्वी कोणताही वापर होत नव्हता आणि परिसरातील नागरिक ती जागा कचरा टाकण्यासाठी वापरत होते. आता इमारत उभारल्याने अस्वच्छतेचा प्रश्न कायमचा निकाली निघण्याची शक्यता आहे.

परिसराच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता
सार्वजनिक बांधकाम विभागाने जळगाव–किनगाव रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून तरसोद–पाळधी बाह्यवळण महामार्ग कार्यान्वित झाल्याने ममुराबाद परिसराचा झपाट्याने विकास होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाची सहा मजली इमारत उभी राहिल्यानंतर नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध होण्याबरोबरच शहराच्या विस्तारालाही चालना मिळेल. तांत्रिक मान्यता मिळताच इमारतीच्या बांधकामाची रूपरेषा तयार करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अमोल बिलसोरे (प्रभारी उपअभियंता, म्हाडा, जळगाव) यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here