लोककलेचा जागर करीत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा


जळगाव समाचार | २७ फेब्रुवारी २०२५

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच खान्देश लोककलावंत परिषद व व.वा. वाचनालयाच्या सहकार्याने मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व.वा. वाचनालयाच्या सभागृहात पार पडलेल्या “महाराष्ट्राची लोकधारा” या विशेष कार्यक्रमात विद्यार्थिनींमध्ये मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पारंपरिक लोककला सादर करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. प्राचार्य डॉ. गौरी राणे, व.वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह, शाहीर विनोद ढगे आणि प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन व.वा. वाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिलभाई शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

कार्यक्रमाची सुरुवात खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे आणि त्यांच्या समूहाने महाराष्ट्राचे राज्यगीत सादर करून केली. त्यांच्या पहाडी आवाजाने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.

त्यानंतर खानदेशातील एक अनोखी लोककला “वहीगायन” सादर करण्यात आले. जळगावच्या वाल्मीक वही मंडळाचे प्रमुख संतोष शामराव चौधरी आणि त्यांच्या समूहाने गणपतीची वही, कानबाईची वही सादर केली. गायत्री बारी या विद्यार्थिनीने उपस्थितांना वहीगायन या कलेची ओळख करून दिली. यानंतर पोवाडा आणि भारुड या दोन पारंपरिक लोककला सादर करण्यात आल्या.

शाहीर विनोद ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पराक्रमाचा “छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा” सादर केला. यावेळी संपूर्ण सभागृह “जय भवानी, जय शिवाजी” च्या जयघोषाने दणाणून गेले. मेघा बारी या विद्यार्थिनीने पोवाडा या कलेची ओळख करून दिली.

यानंतर शाहीर विनोद ढगे यांनी प्रबोधनात्मक भारुड सादर करत, व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम विनोदी शैलीत मांडले. भारुडाच्या माध्यमातून दारूमुळे संसाराचा नाश कसा होतो, हे प्रभावीपणे दाखवण्यात आले.

यानंतर जळगावचे अवधूत वामन दलाल आणि जयमल्हार गोंधळ पार्टी यांनी “गोंधळ” सादर केला. गोंधळाची परंपरा, त्याचे महत्त्व याची माहिती देत त्यांनी गणपतीचे कवन सादर केले. “येळकोट येळकोट जय मल्हार” च्या गजराने संपूर्ण सभागृह भारावून गेले. या कलेची ओळख निकीता सोनवणे या विद्यार्थिनीने करून दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी “लावणी” या पारंपरिक लोककलेचे सादरीकरण झाले. महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी किरण राजू बहारे हिने ठसकेबाज “चंद्रा” ही लावणी सादर करत उपस्थितांना खिळवून ठेवले. शिट्या आणि टाळ्यांच्या गजरात विद्यार्थिनींनी लावणीला भरभरून प्रतिसाद दिला. मेघा बारी हिने लावणी या कलेची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मराठी भाषेची समृद्ध वाटचाल स्पष्ट करत कुसुमाग्रज यांच्या साहित्यसेवेचा आढावा मराठी विभाग प्रमुख डॉ. सत्यजित साळवे यांनी मांडला.
डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी वाचनालय प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
अनिलभाई शाह यांनी लोकगीत, लोककथा आणि लोकसंस्कार यांचे महत्त्व विशद केले.
प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी भाषेचे महत्त्व सांगताना, “भाषा म्हणजे आई, आई जितकी प्रिय, तितकीच भाषा आम्हाला प्रिय आहे,” असे सांगितले.
शाहीर विनोद ढगे यांनी खान्देशाच्या लोककलेच्या जतनासाठी वहीगायनाला राजमान्यता मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. डॉ. आशुतोष पाटील यांनी मराठी भाषा आणि लोककलेच्या अतूट नात्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गौरी राणे होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अनिलभाई शाह, डॉ. शुभदा कुलकर्णी, शाहीर विनोद ढगे, प्रभात चौधरी, डॉ. सत्यजित साळवे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन कल्पना खेडकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अनिता कोल्हे, डॉ. दीपक किनगे, डॉ. सुजाता गायकवाड, प्रा. सायली पाटील, भास्कर बाणाईत, राजू अत्तरे, राजू तायडे, सुहास उणवणे, गणेश शिवदे यांनी विशेष मेहनत घेतली.

या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे दीडशेहून अधिक विद्यार्थिनी भगव्या फेट्यात आणि पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झाल्या. त्यांची उपस्थिती आणि सहभागामुळे संपूर्ण वातावरण मराठमोळ्या रंगात न्हाऊन निघाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here