जळगाव समाचार डेस्क | ३ ऑक्टोबर २०२४
मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, केंद्रीय कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठी माणसांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या आजच्या (३ ऑक्टोबर) बैठकीत पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत यासह मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गेल्या 10 वर्षांपासून सुरू असलेला हा लढा यशस्वी ठरल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.
देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट
या ऐतिहासिक निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले की, “आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो.” त्यांनी या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगून सर्व मराठी भाषिक अभ्यासकांचे आभार मानले.
मराठी भाषेचा गौरव
मराठी भाषेला जवळपास 2 हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या “माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके” या वर्णनाप्रमाणे मराठी भाषेचा अभिजात दर्जा सिद्ध करण्यासाठी अनेक अभ्यासकांनी योगदान दिले. यामुळे मराठी भाषा आता देशातील सातवी अभिजात भाषा ठरली आहे. यापूर्वी तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, आणि उडिया या भाषांना हा मान मिळाला होता.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने होणारे लाभ
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार दिले जातील. तसेच, अभिजात भाषेसाठी एक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिज’ स्थापन होणार असून, प्रत्येक विद्यापीठात मराठीसाठी अध्यासन केंद्र उभे केले जाईल. देशातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होणार आहे. मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी यांना भरीव आर्थिक मदत दिली जाणार आहे.
सातवी अभिजात भाषा
तामिळ (2004), संस्कृत (2005), कन्नड व तेलुगू (2008), मल्याळम (2013) आणि उडिया (2014) यानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.