जळगाव समाचार डेस्क;
मंत्रालयातून पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा एक व्यक्तीने आज प्रयत्न केला. पोलिसांकडून या व्यक्तीचे सुरुवातीला मनधरणीचे प्रयत्न केले गेले. पण संबंधित व्यक्ती ऐकून घेण्याच्या मनस्थीत नव्हती. आपले काम होत नसल्याने या व्यक्तीने मंत्रालयाच्या थेट पाचव्या मजल्यावरुन खिडकीतून बाहेर पडत स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने पुन्हा मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची दमछाक झाली.
यावेळी परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी संबंधित ज्येष्ठ नागरिकास धीर देत समजवले मात्र व्यक्तीवर त्याचा कसलाही प्रभाव होत नव्हता.
यावेळी पोलिसांनी वृद्धाचे लक्ष आपल्या कडे केंद्रित ठेऊन त्याला बोलण्यात व्यस्त ठेवले, घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाचे जवान क्रेनच्या साहाय्याने पाचव्या मजल्यावर पोहोचले. जवळपास तासभर चाललेल्या या थरारनाट्यानंतर वृद्धाला सुखरूप उतरवण्यात आले. या घटनेनंतर संबंधित विभागास वृद्धाचे व त्यांच्या सारख्या इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मिळेल अश्या चर्चा रंगल्या आहेत.