ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन

 

जळगाव समाचार | ४ एप्रिल २०२५

ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जात होते.

मनोज कुमार यांनी केवळ अभिनेते म्हणून नव्हे, तर पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक म्हणूनही आपले कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी भारत सरकारने १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. ‘पूरब और पश्चिम’, ‘क्रांती’ आणि ‘रोटी, कपडा और मकान’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी, फाळणीनंतर पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे झाला. त्यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले आणि दिल्लीला स्थायिक झाले. अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांपासून प्रेरित होऊन त्यांनी आपले नाव बदलून मनोज कुमार ठेवले.

१९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर १९६० मध्ये आलेल्या ‘कच्ची की गुडिया’ या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. पुढे ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यांच्या चित्रपटांमध्ये अनेकदा त्यांचे पात्र ‘भारत कुमार’ या नावाने ओळखले जायचे.

१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर, तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मनोज कुमार यांना युद्धावर आधारित चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला. त्यातून ‘जय जवान जय किसान’ संदेश देणारा ‘उपकार’ हा चित्रपट तयार झाला. हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरला, मात्र शास्त्रीजींच्या अकाली निधनामुळे ते हा चित्रपट पाहू शकले नाहीत.

मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक महान कलाकार गमावला आहे. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here