जळगाव समाचार | २३ ऑक्टोबर २०२५
शहरातील पोलीस मुख्यालय परिसरातील पद्मालय पोलिस हॉल येथे दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत ‘दिवाळी सुफी नाईट’ या नावाने खान्देश टाईम्स न्यूज, महा पोलिस न्यूज आणि जळगाव मिडीया न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पियुष मन्यार या तरुणाने आपल्या परवानाधारक पिस्तूलसह उपस्थित राहून नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारे वर्तन केल्याची बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पियुष मन्यार यांनी त्यांच्या स्वसंरक्षणासाठी मिळालेली परवानाधारक पिस्तूल कमरेला लावून ती स्पष्ट दिसेल असा पांढरा शर्ट घालून स्टेजजवळ नाचत मध्यप्रदेशचे सुप्रसिद्ध गायक शफीक मस्तान यांच्या अंगावर पैशांची ओवाळणी केली. त्याचवेळी त्यांनी हवेत नोटा उधळत जल्लोष केला. या प्रकाराचा व्हिडीओ २२ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर “कमर में पिस्तोल, हाथ में नोट – जलगांव की रात, पुलिस हॉल में VIP पार्टी: नोट और पिस्टल वायरल!” या शीर्षकासह व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली.
या घटनेवरून पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ३०१/२०२५ असा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३० तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. श्री. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव) आणि मा. श्री. नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

![]()




