जळगाव समाचार | २३ सप्टेंबर २०२५
पाचोरा तालुक्यात सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर हिवरा नदीला प्रचंड पूर आला. नदी दुथडी भरून वाहत असताना दुपारी पुलावरून एका अनोळखी प्रौढ व्यक्तीने अचानक उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने कोणाच्याही ऐकले नाही आणि काही क्षणांतच तो पुराच्या पाण्यात बेपत्ता झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने तालुक्यात हाहाकार माजवला असून, नदी-नाले तुडुंब भरले आहेत. रविवारी रात्री व सोमवारी सकाळी झालेल्या पावसामुळे हिवरा, अग्नावती, बहुळा, इंद्रायणी, गडद, तितुर आणि उतावळी नद्यांना पूर आला. अनेक पुलांवर पाणी वाहू लागल्याने गावांचा संपर्क तुटला असून, नगरदेवळा बाजारपेठेत व कृष्णापुरी परिसरात पाणी शिरले. पाचोरा शहरातील कृष्णापुरी आणि पांचाळेश्वर दरम्यानचा रस्ताही बंद करण्यात आला आहे. नदीकाठावरील घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, नदीत उडी मारणाऱ्या व्यक्तीबाबत जारगावचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांनी चौकशी केली असता गावातून कोणताही व्यक्ती बेपत्ता नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. त्यामुळे अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या पथकाकडून नदी परिसरात शोधमोहीम सुरू आहे.