जळगाव समाचार | २० ऑगस्ट २०२५
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शुक्रवारी व शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लवण नाल्याला पूर आला होता. रविवारी सकाळी शेतकरी सर्जेराव संतोष बिरारी (५५) यांचा पाय घसरून ते पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. तीन दिवसांच्या शोधानंतर मंगळवारी दुपारी ग्रामस्थांना त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रांताधिकारी नितीन मुंडावरे व तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पथक व ग्रामस्थांकडून शोधमोहीम राबवण्यात आली होती. पोलिसांनी पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. सायंकाळी शोकाकुल वातावरणात बिरारी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आई, पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.