जळगावात काल झालेल्या खुनातील आरोपींना २४ तासांत अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जलद कारवाई…


जळगाव समाचार | ४ मे २०२५

शहरातील अशोक नगर परिसरात राहणाऱ्या आकाश पंडित भावसार (वय २७) या तरुणाचा शनिवारी रात्री ‘ए वन भारत सेंटर’जवळ धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणात आकाशच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अजय मंगेश मोरे (वय २८, रा. कासमवाडी, जळगाव) याच्यासह चार जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

त्यावर कारवाई करतांना शनिपेठ पोलिसांच्या मदतीने जळगावच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) तात्काळ तपास सुरू करून फक्त २४ तासांत अजय मोरेसह तीन अल्पवयीन आरोपींना अटक केली. आरोपी हे आपल्या मित्रांकडे तर काही नातेवाईकांच्या घरी लपले होते. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांना पकडले.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी कुणाल उर्फ सोनू चौधरी हा सध्या फरार आहे आणि त्याचा शोध सुरू आहे.

शहरात खूनाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, गुन्हेगारीवर कडक नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here