जळगाव महायुतीच्या प्रचारातून राष्ट्रवादी काँग्रेस अदृश्य?

जळगाव समाचार | 8 जानेवारी 2026

जळगाव शहरातील महापालिका निवडणुकीचा प्रचार आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो पार पडला. या दोन्ही प्रचार सभांमध्ये भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख नेते, पदाधिकारी तसेच उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही प्रमुख नेता किंवा कार्यकर्ता या प्रचार कार्यक्रमांमध्ये दिसून न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या गोटात नेमके काय सुरू आहे, की महायुतीत काही वेगळे राजकीय संकेत निर्माण झाले आहेत, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी मांडलेली सावरकर विचारधारेवरील भूमिका आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमोल मिटकरी यांनी केलेले ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचार’ यासंदर्भातील प्रतिपादन, यामुळे महायुतीतील मतभेद पुन्हा ऐरणीवर आले होते.
या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समेटाची भूमिका घेत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला असला, तरी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची प्रचारातून असलेली ठळक अनुपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. महायुतीमध्ये काहीतरी बिनसले आहे का, की ही केवळ स्थानिक पातळीवरील नाराजी आहे, असा प्रश्न जनमानसात चर्चिला जात आहे.
या घडामोडींमुळे जळगावच्या राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली असून, पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here