महापालिकेत महायुतीचा दबदबा; भाजप-शिवसेनेचे १० उमेदवार बिनविरोध…

 

जळगाव समाचार | २ जानेवारी २०२६

महापालिका निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून लढणाऱ्या भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी शुक्रवारी दुपारपर्यंत आपली घोडदौड कायम ठेवली. अर्ज छाननी व माघारीच्या प्रक्रियेत एकूण दहा उमेदवार बिनविरोध निवडले जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यामध्ये भाजपचे चार तर शिवसेना शिंदे गटाचे सहा उमेदवारांचा समावेश आहे. बिनविरोध निवडीमुळे महायुतीची स्थानिक राजकारणातील ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

भाजपच्या गोटात अर्ज छाननीनंतर प्रभागातून उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यानंतर अर्ज माघारीच्या दिवशी आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे (प्रभाग ७ क), विरन खडके (प्रभाग १६ अ) आणि दीपमाला मनोज काळे (प्रभाग ७ अ) यांचीही बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या चारवर पोहोचली.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडूनही बिनविरोध निवडींची मालिका सुरूच राहिली. अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १८ अ मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे पुत्र डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे, तसेच प्रभाग ९ अ मधून मनोज चौधरी आणि प्रभाग ९ ब मधून प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी प्रभाग १९ अ मधून रेखा चुडामण पाटील, प्रभाग २ अ मधून सागर श्यामकांत सोनवणे आणि प्रभाग १९ ब मधून विक्रांत (गणेश) सोनवणे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. त्यामुळे शिंदे गटाच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या सहावर पोहोचली.

या यशामागे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या समन्वयपूर्ण व दूरदृष्टीपूर्ण रणनीतीची निर्णायक भूमिका ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कोणताही संघर्ष न होता सहमतीच्या मार्गाने बिनविरोध निवडी साध्य झाल्याने महायुतीची संघटनात्मक ताकद, नेतृत्वावरील विश्वास आणि कार्यकर्त्यांची निष्ठा स्पष्ट झाली आहे. दहा जागांवरील बिनविरोध विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here