जळगाव समाचार | १० एप्रिल २०२५
महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाला ब्राह्मण्यवादी संघटनांचा विरोध होत असल्यामुळे 11 एप्रिल रोजी होणारे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच, सेन्सॉर बोर्डाकडून अनेक महत्त्वाच्या दृश्यांवर आक्षेप घेत त्यांना हटवण्यास सांगितले आहे. या प्रकारावर वंचित बहुजन आघाडीने तीव्र नाराजी व्यक्त करत, सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, “महात्मा फुलेंच्या विचारधारेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. 11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता महात्मा फुले वाडा, पुणे येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला मी स्वत: उपस्थित राहणार आहे.”
चित्रपटातील ऐतिहासिक घडामोडींवर आधारित अनेक महत्त्वाच्या दृश्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावल्यामुळे या निर्णयावर टीका होत आहे. संबंधित पत्र देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

![]()




