महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये ? – सूत्र…

 

जळगाव समाचार डेस्क| १३ ऑगस्ट २०२४

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने (MVA) मिळवलेल्या यशानंतर संपूर्ण राज्याच्या नजरा आता आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत. विधानसभा निवडणूक कोणत्या तारखेला होणार आणि मतमोजणी कधी होईल, याबाबत अद्याप निवडणूक आयोगाने अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात न होता नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच दिवाळी आहे, त्यामुळे मतदान आणि मतमोजणी दिवाळी संपल्यानंतरच पार पडेल, अशी माहिती मिळत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी संपल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे मतदान होऊ शकते, आणि साधारण १४ किंवा १५ नोव्हेंबरच्या आसपास निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या नियमानुसार, नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्त्वात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक घेण्याची योजना आखल्यास, साधारण १२ ऑक्टोबरच्या आसपास निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते. यानंतर लगेचच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल.
यापूर्वी २० सप्टेंबरच्या आसपास आचारसंहिता लागू होईल, अशी चर्चा होती. जर असे झाले असते, तर विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाल्या असत्या. मात्र, सध्या सरकारी पातळीवर कारभार नेहमीप्रमाणे सुरु आहे, आणि निवडणुकीची घोषणा लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक आहे.
महायुती सरकारला (Mahayuti) त्यांच्या योजनांच्या प्रचारासाठी अधिक वेळ मिळण्याची शक्यता आहे, विशेषत: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत. निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरमध्ये झाल्यास, महायुतीला त्यांच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी किमान १५ दिवस जास्त मिळू शकतात. तसेच, सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणूक नको, असा सूर काही राजकीय पक्षांमध्ये आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here