जळगाव समाचार | २७ मे २०२५
राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये तातडीने नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, शाळेतील शिस्त आणि कर्मचारी वर्गाची पार्श्वभूमी यांचा विचार करून हे निर्णय घेण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, आता प्रत्येक शाळेत दिवसभरात तीन वेळा – सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी – विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाणार आहे. जर एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल, तर त्याच्या पालकांना तात्काळ एसएमएस पाठवून माहिती दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती सुनिश्चित होणार असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकही सतर्क राहू शकतील.
शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे कॅमेरे शाळेच्या प्रवेशद्वारावर, वर्गाच्या दरवाज्यावर, कॉरिडॉरमध्ये, मैदानांमध्ये आणि स्वच्छतागृहांच्या बाहेर लावले जाणार आहेत. यामधून विद्यार्थ्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवता येईल आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला वेळीच आळा घालता येईल. या कॅमेर्यांचा कमीत कमी एक महिन्याचा व्हिडिओ बॅकअप ठेवणे बंधनकारक असेल.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. एखाद्या कर्मचाऱ्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळल्यास त्याची सेवा त्वरित समाप्त केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक शाळेत समुपदेशक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेत मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, तसेच स्वच्छतागृहाजवळ स्वच्छ परिसर, पाण्याची सोय, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या नव्या नियमावलीमुळे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिस्त अधिक मजबूत होणार असून, सर्व शाळांनी याची अंमलबजावणी तात्काळ करावी, असे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.