जळगाव समाचार डेस्क| २३ ऑगस्ट २०२४
देशभरातील विविध घटनांनी जनता हादरलेली असतानाच आता साताऱ्यातील कराडमधील एका अनाथाश्रमात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अनाथाश्रमात मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा आरोप असून याप्रकरणी आश्रमचालक महिला रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
कराडमधील टेंबू गावात ‘आई चॅरिटेबल ट्रस्ट’ संचलित निराधार आश्रमाच्या नावाखाली हे कृत्य सुरू होते. या आश्रमात अनेक अनाथ मुली आणि महिलांची भरती केली जात होती. परंतु, रेखा सकट ही महिला या मुलींना वेश्याव्यवसायात ढकलण्याचा घृणास्पद प्रकार करत असल्याचे उघड झाले आहे. साताऱ्यातील एका अनाथ युवतीच्या तक्रारीनंतर हा प्रकार समोर आला.
युवतीने कराड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आश्रमात तिच्यासह अनेक मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलले जात होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रेखा सकट आणि तिचा प्रियकर वाल्मिकी माने यांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांना 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार मुलीनुसार, या अनाथाश्रमात आलेल्या अनेक मुलींच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. सध्या फक्त एका मुलीने तक्रार दिली आहे, मात्र इतर कोणी तक्रार नोंदवलेली नाही. या प्रकरणाचे धक्कादायक पुरावे म्हणून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स समोर आल्या आहेत. या व्हिडीओंमध्ये आरोपी रेखा सकट हिचे अनाथाश्रमातील मुलांकडून जबरदस्तीने काम करून घेत असल्याचे आणि मुलींचे मानसिक तसेच शारीरिक शोषण करत असल्याचे दिसत आहे.
एकाच्या ऑडिओ क्लिपमध्ये तर एका गतीमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराची सेटलमेंट करण्यासाठी पैशाची देवाणघेवाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे आता संपूर्ण समाज हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, कराड पोलिसांच्या तपासाची दिशा आणि पद्धतीवर सर्वांचे लक्ष आहे.
सध्या कराड पोलीस या प्रकरणाच्या विविध कंगोऱ्यांचा सखोल तपास करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पुराव्यांचा आधार घेत, अधिक आरोपींची चौकशी सुरू आहे. या तपासातून आणखी किती मुली या शोषणाचा बळी ठरल्या, हे समोर येईल. पोलिसांकडून या प्रकरणात कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे समाजात अशा घटनांना आळा बसेल.

![]()




