जळगाव समाचार डेस्क। २६ ऑगस्ट २०२४
राज्यभर बदलापूर येथील मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संतापाचे वातावरण असतानाच, पुण्यातील खडकवासला येथे 68 वर्षीय विकृत वृद्धाने एका 10 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील ही घटना उघड झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.(Rape Crime)
आरोपी दिलीप नामदेव मते (वय 68, रा. खडकवासला) याने मुलीला खाऊचे आमिष दाखवून घरात ओढून नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर मुलीने कोणालाही काही सांगितले नाही, परंतु दुसऱ्या दिवशी शाळेत ‘गुड टच बॅड टच’ उपक्रमादरम्यान मुलीला आपल्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. तिने ही माहिती वर्गशिक्षिकेला दिली, त्यानंतर मुख्याध्यापकांनी मुलीच्या वडिलांना बोलावून या प्रकरणाची माहिती दिली. वडिलांनी तत्काळ मुलीसह हवेली पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून सापळा रचून आरोपीला अटक केली. हवेली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गोपनीयतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने पुण्यातील पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यभरात संतप्त नागरिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे, तसेच आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणीही जोर धरत आहे.

![]()




