“शिंदे यांच्या योजना का बंद केल्या?” ; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल…


जळगाव समाचार | १२ मार्च २०२५

विधानसभा अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विरोधकांनी मंगळवारी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने सुरू केलेल्या अनेक योजना सरकारने बंद केल्याचा आरोप करत, “शिंदे यांच्या योजना का बंद केल्या? त्यांच्याकडे दुर्लक्ष का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला.

शिंदे सरकारच्या योजनांचा उल्लेख नाही – वड्डेटीवार

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना सरकारला प्रश्न विचारले. “शिंदेंनी मुख्यमंत्री असताना ‘लाडकी बहिण योजना’, ‘गुलाबी रिक्षा’, ‘अन्नपूर्णा योजना’, ‘शिवभोजन थाळी’, ‘आनंदाचा शिधा’, ‘१ रुपयात पीक विमा’, ‘युवा कार्य प्रशिक्षण योजना’, ‘ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजना’ यासारख्या महत्त्वाच्या योजना आणल्या होत्या. मात्र, या सर्व योजनांचा या अर्थसंकल्पात उल्लेखही नाही. मग शिंदे सरकारच्या योजना या सरकारला चालत नाहीत का?” असा उपरोधिक सवाल वड्डेटीवार यांनी केला.

“संत तुकारामांचे अभंग आणि शिंदे, दोघेही गायब” – जयंत पाटील

शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनीही सरकारवर टीका करत, “मागील अर्थसंकल्पात संत तुकारामांचे अभंग म्हटले गेले होते, पण यंदा त्यांचा उल्लेखही नाही. जसे तुकोबांना दूर केले तसेच शिंदे यांनाही दूर करण्याची तुमची योजना दिसते,” असा टोला लगावला. “राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन करणार म्हणता, पण त्यासाठी विकासदर १४-१५% लागतो. सध्या तो केवळ ७.३% आहे, मग ही घोषणा कशी पूर्ण करणार?” असा प्रश्नही त्यांनी केला.

“शेतकऱ्यांची फसवणूक कशाला?” – जितेंद्र आव्हाड

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. “कर्जमाफीबद्दल एकही शब्द नाही, ‘शेतकरी सन्मान योजनेत’ ३ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, पण त्याचा कुठे उल्लेख नाही? शेतीच्या वीज बिल माफीच्या नावाखाली उलट बिल वाढवले जात आहे. मागील बिल भरल्याशिवाय शून्य बिल मिळणार नाही, असे महावितरणचे अधिकारी सांगतात. म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे,” असे आव्हाड म्हणाले.

“निवडणुकीत बहिणींना खूश केले, आता काय?” – भास्कर जाधव

उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात सरकारला लक्ष्य केले. “निवडणुकीआधी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. सरकार म्हणाले होते की ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, पण आता अर्थसंकल्पात केवळ ३६ हजार कोटींची तरतूद दिसते. म्हणजे १० हजार कोटी रुपयांची कपात झाली. म्हणजेच, ५० लाख महिलांना लाभ मिळणार नाही. मग निवडणुकीपूर्वी बहिणींना फसवले का?” असा सवाल जाधव यांनी केला.

या चर्चेदरम्यान विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे यांच्या योजनांवरूनच त्यांच्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सरकारला घेरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here