जळगाव समाचार डेस्क। २७ ऑगस्ट २०२४
बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता पुण्यात आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. पुणे शहरातील खराडी परिसरात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली असून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
खराडी येथील नदीपात्रात चंदननगर पोलिसांना एका तरुणीचे धड आढळले. या तरुणीचे वय अंदाजे 18 ते 30 वर्षे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. अज्ञात आरोपीने या तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि धड नदीपात्रात फेकले असल्याचा संशय आहे.
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.