जळगाव समाचार | १५ डिसेंबर २०२५
राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा आज (१५ डिसेंबर) जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोग आज सायंकाळी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असून, यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक घोषित केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या निवडणुकांना ‘मिनी विधानसभा’ म्हणूनही ओळखले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी, पनवेल, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, इचलकरंजी, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, मालेगाव, लातूर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, नागपूर, अकोला आणि अमरावती या महापालिकांचा समावेश असणार आहे. या निवडणुकांमुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांच्या कारभाराची दिशा ठरणार आहे.
महापालिकांच्या प्रभाग रचनेबाबतही अंतिम आकडे स्पष्ट झाले असून, मुंबईत २२७ प्रभाग, पुण्यात ४२ प्रभाग (१६२ नगरसेवक), पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ प्रभाग (१२८ नगरसेवक), ठाण्यात ४८, नाशिकमध्ये १२२, नागपूरमध्ये ५२, कल्याण-डोंबिवलीमध्ये १२३, नवी मुंबईत १११, वसई-विरारमध्ये २९ प्रभाग (११५ नगरसेवक) तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ११३ प्रभाग असणार आहेत. यासह कोल्हापूर, सोलापूर, उल्हासनगर, अकोला आणि अमरावती महापालिकांतील प्रभाग संख्याही निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्यामागे ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न आणि प्रभाग रचनेवरील न्यायालयीन याचिका ही दोन प्रमुख कारणे होती. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेली तिहेरी चाचणी पूर्ण न झाल्याने प्रक्रिया रखडली होती. मात्र, इम्पिरिकल डेटा गोळा करून अहवाल सादर केल्यानंतर हा अडथळा दूर झाला आहे. तसेच प्रभाग रचनेविरोधातील याचिकांवरही स्पष्टता मिळाल्याने आता निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

![]()




