जळगाव समाचार | २४ मार्च २०२६
जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र एलपीजी गॅस टंचाईमुळे केटरिंग व्यवसाय अडचणीत सापडला असून सुमारे २५ हजार कामगारांच्या रोजगारावर गंभीर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खान्देश केटरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने केटरिंग व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गेल्या काही आठवड्यांपासून व्यावसायिकांना आवश्यक त्या प्रमाणात एलपीजी गॅसचा नियमित पुरवठा होत नसल्याने अनेक कार्यक्रम अडचणीत आले आहेत. अनेक व्यावसायिकांनी सहा ते आठ महिन्यांपूर्वीच लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक समारंभांसाठी बुकिंग घेतलेली आहेत. मात्र गॅसअभावी या कार्यक्रमांचे नियोजन करणे आणि दर्जेदार सेवा देणे कठीण झाले आहे. केटरिंग व्यवसायासाठी लग्नसराईचे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यानंतर चार महिन्यांच्या कालावधीत लग्नाचे मुहूर्त नसल्याने व्यवसायात मंदी येते. त्यामुळे सध्या मिळणारे काम हेच वर्षभराच्या उत्पन्नाचा मोठा आधार असल्याने गॅस टंचाईमुळे आर्थिक फटका बसण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
खान्देश केटरिंग असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार केटरिंग व्यवसायावर थेट आणि अप्रत्यक्षपणे सुमारे २५ हजार कामगार अवलंबून आहेत. यात स्वयंपाकी, वेटर, भांडी धुणारे कामगार, डेकोरेशन कामगार, वाहतूक करणारे कर्मचारी तसेच इतर सहाय्यक कामगारांचा समावेश आहे. गॅस टंचाई कायम राहिल्यास या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असून अनेकांना पर्यायी रोजगारासाठी स्थलांतर करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय गॅस टंचाईमुळे काळाबाजार वाढल्याच्या तक्रारीही समोर येत असून काही ठिकाणी जादा दराने सिलिंडर मिळत असल्याने व्यावसायिकांचा खर्च वाढत आहे. या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नियमित आणि पारदर्शक गॅस वितरण व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या असून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी दुपारी तीन वाजता केटरिंग असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत गॅस वितरण कंपन्यांचे प्रतिनिधी, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश टाटिया, शहर उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव महेंद्र टाडा, सदस्य रामचंद्र टाडा, मेघराज महाराज तसेच सल्लागार राजेंद्र वैष्णव यांच्यासह अनेक पदाधिकारी निवेदन सादर करताना उपस्थित होते. यावेळी जळगाव जिल्ह्यातील सुमारे ११० केटरिंग व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावून आपली व्यथा मांडली असून बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण खान्देशातील केटरिंग व्यवसायाचे लक्ष लागले आहे.

![]()




