जळगाव समाचार डेस्क। ९ ऑगस्ट २०२४
कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील एका गावात प्रेम विवाहानंतर घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरला आहे. नवीन कुमार आणि लिखिता श्री या नवविवाहित जोडप्याच्या आयुष्याचा शेवट दुर्दैवी आणि हिंसक पद्धतीने झाला. ७ ऑगस्ट रोजी धुमधडाक्यात विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याचा सुखी संसार अवघ्या काही तासांतच रक्ताच्या थारोळ्यात संपला.
लग्नानंतर, नवीन आणि लिखिता यांनी कुटुंबीयांसोबत आनंदाने वेळ घालवला. त्यानंतर चहा पिण्यासाठी ते एका नातेवाईकाच्या घरी गेले, जिथे दोघांमध्ये अचानक कोणत्यातरी गोष्टीवरून मोठा वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि नवीनने संतापाच्या भरात धारदार कुऱ्हाडीने लिखिता श्रीवर हल्ला केला. त्यानंतर त्याच कुऱ्हाडीने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
नातेवाईकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर, दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. तातडीने दोघांना रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केले, तर गंभीर जखमी असलेल्या नवीनला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गुरुवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे.