जळगाव समाचार | १४ फेब्रुवारी २०२५
विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते. मग ते प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न. नियतीने ज्या व्यक्तीची सोबत लिहिली आहे, ती अखेर मिळतेच. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात घडलेली एक घटना याचे प्रत्यंतर देणारी आहे. येथे एका तरुणीने कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध जाऊन प्रियकराशी आर्य समाज मंदिरात विवाह केला. मात्र, कुटुंबीयांकडून तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने नववधूने थेट पोलिसांकडे धाव घेतली.
चुरू जिल्ह्यातील सरदारशहर येथील रहिवासी विजया पुनिया (वय 20) हिच्या कुटुंबाने तिच्या विवाहासाठी एक वर पसंत केला होता. ठरलेल्या तारखेला (2 फेब्रुवारी) वधूपरीक्षेसाठी मुलगा आणि त्याचे कुटुंब येणार होते. मात्र, विजयाला हे लग्न मान्य नव्हते. कारण, ती चार वर्षांपासून रामगोपाल प्रजापत (वय 24) याच्यावर प्रेम करत होती. दोघांची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. रामगोपाल दिल्ली विद्यापीठातून बी.एस्सी पदवीधर असून, सध्या तो एका फायनान्स कंपनीत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. तर, विजयाने 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.
कुटुंबाने तिचे लग्न ठरवल्याचे कळताच विजयाने घर सोडण्याचा निर्णय घेतला. 2 फेब्रुवारी रोजीच ती घरातून निघून गेली आणि थेट आर्य समाज मंदिरात जाऊन रामगोपालशी विवाह केला. मात्र, या घटनेने तिचे कुटुंब संतप्त झाले. तिच्या वडिलांनी तिला धमक्या देण्यास सुरुवात केली.
लग्नानंतर नवविवाहित जोडपे सरळ पोलीस ठाण्यात गेले. तेथे रडणाऱ्या विजयाने पोलिसांना सांगितले, “सर, माझे वडील माझ्या नवऱ्याला मारून टाकतील. आम्हाला सतत धमक्या मिळत आहेत. आमच्या जीवाला धोका आहे, आम्हाला वाचवा.”
पोलिसांनी संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यावर विजयाने सांगितले की, तिच्या वडिलांनी तिच्याविरोधात चोरीची खोटी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला की, ती दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली. मात्र, विजयाने स्पष्ट केले की, ती घरातून रिकाम्या हाताने निघून आली होती.
विजयाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तिच्या वडिलांसह कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी केली जाणार असून, नवविवाहित दाम्पत्याला सुरक्षा पुरवणार असल्याचे पोलिसांनी कळवले आहे. पुढील तपास सुरू आहे.