मुंबई विभागात ७२ मेल लोको पायलटांचा सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय

 

जळगाव समाचार | १८ फेब्रुवारी २०२६

मुंबई : शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ७२ मेल लोको पायलटांनी एकत्रितपणे स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित सर्व लोको पायलटांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग यांना लेखी पत्र देत स्वेच्छानिवृत्तीला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. प्रशासकीय दबाव, कथित छळ आणि वाढत्या तणावाच्या वातावरणात काम करणे कठीण होत असल्याचा दावा त्यांनी निवेदनात केला आहे. ही घटना अलीकडे घडली असून, एकाच वेळी ७२ जणांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मुंबई विभागात सध्या सुमारे २४० मेल लोको पायलट कार्यरत असून सुमारे २३० पदे रिक्त आहेत. या मोठ्या रिक्ततेमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. अनियमित कर्तव्ये, विश्रांतीचा अपुरा कालावधी तसेच प्रशासकीय संवेदनशीलतेचा अभाव यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे लोको पायलटांचे म्हणणे आहे. विश्रांतिगृहांमध्ये पुरविले जाणारे अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार करण्यात आली असून स्वच्छता, योग्य देखभाल, प्रकाशयोजना व मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने कामानंतर आवश्यक विश्रांती मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. सिग्नल संदर्भातील किरकोळ चुकांवर सक्तीची निवृत्ती (सीआरएस), वेतन कपात किंवा पदावनतीसारख्या कारवाया होत असल्याने सेवानिवृत्तीवेळी आर्थिक नुकसान सहन करावे लागते, अशीही खंत व्यक्त करण्यात आली आहे.

रेल्वेला दीर्घकाळ समर्पित सेवा दिल्यानंतरही आरोग्य, सुरक्षितता आणि प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणाऱ्या समस्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही उपाययोजना न झाल्याने अखेर सामूहिक स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घ्यावा लागल्याचे ७२ लोको पायलटांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. ५० वर्षांवरील काही कर्मचारी विशेषतः स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते आणि रिक्त पदे व कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here