टिटवाळा सीएसएमटी लोकलचा डबा रुळावरून घसरला, जीवितहानी नाही…

जळगाव समाचार डेस्क | १९ ऑक्टोबर २०२४

कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील टिटवाळा सीएसएमटी लोकलच्या गार्डचा डबा कल्याण रेल्वे स्टेशनजवळ रुळावरून घसरल्याची घटना गुरुवारी साडे बारा वाजता घडली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असली तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत डबा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या टिटवाळा सीएसएमटी लोकल ट्रेनचा गार्डचा डबा कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर घसरला. या लोकल ट्रेनमध्ये किती प्रवासी होते, याची नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु, प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घसरलेला डबा रुळावर आणण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. ऐन घरी जाण्याच्या वेळी ही घटना घडल्याने प्रवाशांचे हाल झाले. तब्बल साडे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गार्डचा डबा पुन्हा रुळावर आणण्यात यश आले.

या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला होता, परंतु गार्डचा डबा रुळावर आल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीसाठी योग्य ती काळजी घेतली असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here