जळगाव समाचार | ४ नोव्हेंबर २०२५
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची सर्वांनाच आतुरतेने प्रतीक्षा लागली आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, याच परिषदेत नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर राज्यात तात्काळ आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेतल्या जातील, तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २१ दिवसांच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावर वेळेचे बंधन आले असून, आयोगाकडून आजच निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे.
या आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील २९ महापालिका, ३२ जिल्हा परिषदा, ४२ नगर पंचायती, ३३६ पंचायत समित्या आणि २४६ नगरपालिका या संस्थांचा समावेश आहे. या सर्व संस्थांची मुदत संपल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्था निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहे.
या निवडणुकांची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट) तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गट) यांनी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अलीकडेच मतदार यादीतील घोळांच्या मुद्यावर विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. मनसे आणि महाविकास आघाडीने संयुक्तरित्या “सत्याचा मोर्चा” काढत या घोळांचा निषेध नोंदवला होता. मतदार यादीतील अनेक त्रुटींचे पुरावे विरोधकांनी आयोगासमोर ठेवले होते. अशा पार्श्वभूमीवर आयोग आज निवडणुकीची घोषणा करताच विरोधक कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, अकोला, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निझामपूर, नांदेड-वाघाळा, पनवेल, मालेगाव, सांगली-मिरज-कुपवाड, मीरा-भायंदर, अहिल्यानगर, इचलकरंजी, धुळे, जळगाव आणि जालना या प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. या महापालिकांमध्ये थेट सत्तेच्या समीकरणावर परिणाम करणारे निकाल लागणार असल्याने सर्व पक्ष या रणांगणात पूर्ण शक्तीनिशी उतरतील, हे निश्चित मानले जात आहे.
जिल्हा परिषद निवडणुकाही महत्वाच्या
धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील एकाचवेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील सत्ता समीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका जाहीर होताच महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा तापमान चढणार आहे हे मात्र निश्चित.

![]()




