स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार गायकवाडांकडे ; वादाच्या भोवऱ्यात सापडलेले संदीप पाटील नियंत्रण कक्षात मंगेश चव्हाणांच्या आरोपानंतर पोलीस अधीक्षकांकडून तडकाफडकी कारवाई

 

जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५

जिल्हा पोलिस दलातील नेहमीच चर्चेत राहणारे स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पद पुन्हा एकदा बदलाच्या भोवऱ्यात अडकले आहे. वादग्रस्त ठरलेले निरीक्षक संदीप भटू पाटील यांची तातडीने बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले असून, त्यांच्या जागी राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक हा जिल्हा पोलीस अधीक्षकांनंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा जबाबदारीचा पद मानला जातो. त्यामुळे या पदावरील बदलांवर नेहमीच साऱ्यांचे लक्ष केंद्रीत असते.

गेल्या वर्षी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या सेवापूर्तीनंतर या पदावर बबन आव्हाड यांची नेमणूक झाली होती. मात्र, नंतरच्या काळात ड्रग्ज प्रकरणावर अधिवेशनात गाजलेला मुद्दा समोर आल्यानंतर आव्हाड यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर संदीप पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखेत नेमण्यात आले होते.

दरम्यान, आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी गंभीर आरोप उपस्थित केला. एका महिलेच्या शोषणप्रकरणी संदीप पाटील यांचे नाव समोर आल्याचा ठपका ठेवत, संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सभेत स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने आदेश काढत संदीप पाटील यांना नियंत्रण कक्षात बदली केली. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेतील अनुभवी अधिकारी राहुल गायकवाड यांना स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक म्हणून पदभार देण्यात आला आहे.

या नव्या घडामोडीमुळे पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पद जिल्ह्यातील चर्चेचा आणि राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here