जळगाव समाचार | ८ नोव्हेंबर २०२५
पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अमेडिया कंपनीने व्यवहार रद्द करण्याचा अर्ज दाखल केल्यानंतर सहदुय्यम निबंधक कार्यालयाने तब्बल 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्याची सक्ती केली आहे. आयटी पार्क उभारण्याच्या नावाखाली मिळालेली स्टॅम्प ड्युटी सवलत व्यवहार रद्द करतानाही लागू न पडणार असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे.
अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर अमेडिया कंपनीने नोंदणी कार्यालयात लेखी विनंती सादर केली होती. मात्र कार्यालयाने सांगितले की पूर्वी दाखवलेल्या आयटी पार्क प्रकल्पाचा आधार आता ग्राह्य नसल्याने व्यवहार रद्द करण्यासाठी पूर्ण मुद्रांक शुल्क भरावा लागेल. पाच टक्के मुद्रांक शुल्क, एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो कर मिळून एकूण 21 कोटी रुपये जमा केल्याशिवाय व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया पुढे सरकणार नाही.
या प्रकरणाच्या मूळात असलेला कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर जमीन व्यवहार गेल्या काही दिवसांत चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अमेडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत पार्थ पवार आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील हे प्रमुख भागीदार आहेत. सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी या व्यवहारातील गैरव्यवहाराबाबत बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, जमीन विक्रेती शीतल तेजवानी, भागीदार दिग्विजय पाटील आणि सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित शीतल तेजवानी फरार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तिच्यावर दोन गुन्हे दाखल असून मोबाईल फोन बंद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती राहत्या घरी न आढळल्यामुळे ती नवऱ्यासह देशाबाहेर गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बावधन पोलिसांनी इमिग्रेशन विभागाकडून तिच्या संभाव्य परदेश प्रवासाची माहिती मागवली आहे.
शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सुर्यवंशी हे दोघेही पूर्वीपासून आर्थिक गैरव्यवहारांत अडकलेले आहेत. 2019 च्या ऑडिटमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतलेल्या 41 कोटींच्या कर्जप्रकरणाचा पर्दाफाश झाला होता. कर्जफेड टाळल्याने रक्कम 60 कोटींपर्यंत वाढली. त्यानंतर ईडी, सीआयडी आणि स्थानिक पोलिसांनी त्यांच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की 1800 कोटींची जमीन अमेडिया कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये मिळवली. तसेच या व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा दावा करून हा व्यवहार अविश्वसनीय गतीने फक्त 27 दिवसांत पूर्ण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या आरोपांमुळे राज्यात मोठे राजकीय तापमान निर्माण झाले असून पुढील तपासातून या प्रकरणात निर्णायक घडामोडी समोर येण्याची चिन्हे आहेत.

![]()




