जळगाव समाचार | २१ मे २०२५
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता आपल्या जमिनीची मोजणी आणि हिस्सेवाटप अवघ्या 200 रुपयांत होणार आहे. यापूर्वी यासाठी एक ते चार हजार रुपये शुल्क लागायचे, पण आता हे मोठ्या प्रमाणावर कमी करण्यात आले आहे.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, यामुळे शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा कमी होणार असून, गरीब कुटुंबांनाही याचा फायदा होईल.
या निर्णयानुसार, केवळ 200 रुपये भरून शेतकऱ्यांना नोंदणीकृत वाटणीपत्र आणि जमिनीचे नकाशे मिळणार आहेत. हे कागदपत्र खरेदी-विक्री व्यवहार, कोर्ट केस आणि जमिनीवरील हक्कासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
सध्या जमिनीच्या मोजणीसाठी तीन प्रकार आहेत:
1. साधी मोजणी – सुमारे 6 महिन्यांचा कालावधी, जुने शुल्क: ₹1000
2. तातडीची मोजणी – 3 महिन्यांत प्रक्रिया, जुने शुल्क: ₹2000
3. अतितातडीची मोजणी – 2 महिन्यांत प्रक्रिया, जुने शुल्क: ₹3000
पण आता, सर्वसामान्यांसाठी ही प्रक्रिया केवळ 200 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, जमिनीची मोजणी आता अधिक पारदर्शक आणि स्वस्त होणार आहे.