जळगाव समाचार | ११ सप्टेंबर २०२५
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी कपाशीवरील लाल्याचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कपाशीच्या बोंडांच्या परिपक्वतेच्या टप्प्यावर असलेल्या पिकावर पाऊस थांबल्यानंतर अचानक लाल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामात कपाशीचे क्षेत्र जवळपास २१ टक्क्यांनी घटले आहे. हिरवी पाने अचानक लालसर पडणे, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आणि अन्नद्रव्यांचा असमतोल यामुळे कपाशीवर लाल्याची विकृती निर्माण होत असल्याचे निरीक्षण कापूस संशोधन केंद्राच्या तज्ज्ञांनी नोंदवले आहे. अमेरिकन संकरित बीटी वाणावर ही विकृती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. पाण्याचा ताण, जमिनीत अतिरिक्त पाणी साठणे, तापमानातील अचानक बदल, नत्र व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा असमतोल आणि वाफसा नसणे ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत.
लाल्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. लागवडीच्या सुरुवातीपासून सेंद्रिय खत, शेणखत, कंपोस्ट व गांडूळ खतांचा वापर करावा, तसेच ॲझेटोबॅक्टर व स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया करावी. रासायनिक खतांचा शिफारशीप्रमाणे योग्य वेळी योग्य मात्रेत वापर करावा. पावसाचे पाणी साचल्यास तातडीने निचरा करावा आणि पाण्याची कमतरता असल्यास एक सरी आड सरी पाणी द्यावे. वाफसा स्थिती निर्माण करण्यासाठी हलकी कोळपणी करावी, तसेच मातीची भर लावावी. नत्राचा शेवटचा हप्ता दिला नसेल तर एकरी ४० ते ५० किलो युरिया वापरणे आवश्यक आहे, तर मॅग्नेशियम सल्फेट २० ते ३० किलो हेक्टरी वापरावा. त्यासोबत दोन टक्के डीएपी किंवा विद्राव्य खतांची फवारणी करावी आणि पहिल्या फवारणीनंतर १०-१५ दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारणी करावी, असे मार्गदर्शन कापूस संशोधन केंद्राने केले आहे.
कपाशीच्या पिकात बोंडे पोसण्याच्या अवस्थेत लाल्याचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. -डॉ. गिरीश चौधरी (पैदासकार- कापूस संशोधन केंद्र, जळगाव)