जळगाव समाचार डेस्क | ३१ ऑगस्ट २०२४
जळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या ‘लखपती दीदी संमेलन’ कार्यक्रमाने ऐतिहासिक ठसा उमटवला आहे. शासन आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
ग्रामविकास मंत्री महाजन यांनी सांगितले की, “आम्ही शासन म्हणून होतो, पण प्रशासनाने तळमळीने आणि झोकून देऊन काम केले, म्हणूनच विपरीत परिस्थितीतही हा ऐतिहासिक कार्यक्रम शक्य झाला.” पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमाबद्दल आपल्या आयुष्यातील महिलांचा सर्वात मोठा आणि सुनियोजित कार्यक्रम म्हणून गौरव व्यक्त केला.
नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात ‘लखपती दीदी संमेलन’ आणि ‘महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ यशस्वीपणे पार पडल्याबद्दल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात महाजन आणि पाटील यांच्या हस्ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे आणि ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे हे मान्यवर उपस्थित होते.
महाजन यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन पंतप्रधानांचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक केले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या ऐतिहासिक कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात या कार्यक्रमाची नोंद अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी, ‘लखपती दीदी संमेलन’ यशस्वी करणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, एस.टी. महामंडळाचे अधिकारी आणि इतर सर्व संबंधितांचा गौरव करण्यात आला.