जळगाव समाचार | २३ फेब्रुवारी २०२५
विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी सुरू आहे. सुरुवातीला २ कोटी ३१ लाख ८६० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारवर आर्थिक ताण वाढल्यामुळे हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जात आहे.
40 लाख लाडक्या अपात्र होणार?
सुरुवातीला पाच लाख लाभार्थी अपात्र ठरवण्यात आले होते, मात्र आता ही संख्या ४० लाखांच्या घरात जाऊ शकते, असा अंदाज आहे. अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:
निकष अपात्र लाभार्थ्यांची संख्या
संजय गांधी निराधार योजना लाभार्थी २.३० लाख
६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या महिला १.१० लाख
चारपेक्षा जास्त वाहनं असलेल्या, नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या महिला १.६० लाख
फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या छाननी प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या २ लाख
सरकारी कर्मचारी आणि दिव्यांग महिलांमधून अपात्र ठरलेल्या २ लाख
सरकारचे कोट्यवधी रुपये वाचणार!
लाडकी बहिण योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जात होता. मात्र, निवडणुकीपूर्वी काटेकोर छाननी न करता लाभ देण्यात आल्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण आला.
• योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतला आहे.
• सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे.
• ३० ते ३९ वयोगटातील महिलांनी सर्वाधिक अर्ज केले होते.
लाभार्थ्यांचा वर्गवारीनुसार आकडा:
• विवाहित महिला – ८३%
• अविवाहित महिला – ११.८%
• विधवा महिला – ४.७%
• घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिला – १% पेक्षा कमी
सरकारने घेतलेला निर्णय
सध्या अपात्र ठरलेल्या महिलांकडून मिळालेला पैसा परत घेणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी योजना मंजूर करताना काटेकोर छाननी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.