जळगाव समाचार डेस्क | ४ फेब्रुवारी २०२५
महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेत मोठा बदल करण्यात आला असून, आता लाभार्थी महिलेच्या कुटुंबात जर पती किंवा सासऱ्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल, तर तिला योजनेचा लाभ मिळणार नाही. महिला व बाल कल्याण विभागाने या संदर्भात अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे.
अंगणवाडी सेविका करणार घरोघरी तपासणी
महिला लाभार्थ्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे की नाही, हे तपासण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील. तसेच, परिवहन विभागाकडून वाहन मालकांची यादी घेऊन तिची पडताळणी केली जाणार आहे.
कोणता लाभ बंद होणार?
• जर सासऱ्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल, तर सासूला मिळणारा लाभ बंद होईल.
• जर सून लाभ घेत असेल आणि सासऱ्यांकडे गाडी असेल, तर तिचाही लाभ बंद केला जाईल.
• मात्र, जर पती-पत्नी एका जिल्ह्यात राहतात आणि त्यांच्याकडे गाडी नाही, पण सासू-सासरे वेगळ्या जिल्ह्यात राहून वाहनधारक असतील, तर अशा प्रकरणांचा वेगळा विचार केला जाईल.
सरकारचा हेतू – गरजू महिलांनाच लाभ द्यायचा
या बदलामुळे खऱ्या गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळता यावे, हा सरकारचा उद्देश आहे. सध्या लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, ही योजना केवळ गरजू महिलांसाठीच राहावी, यासाठी सरकारने हे नवे निकष लागू केले आहेत.