जळगाव समाचार | ५ मार्च २०२५
राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये मिळणार असून, हा एकूण 3000 रुपयांचा निधी 7 मार्चपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेतला असून, राज्य सरकारने मार्च महिन्याचा हप्ता लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे पैसे 24 तारखेदरम्यान जमा झाले होते. मात्र, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेवर मिळू शकला नव्हता. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये एकत्र मिळणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी परभणी येथील कार्यक्रमात योजनेसाठी 3490 कोटी रुपयांच्या निधीवर सही केल्याचे सांगितले होते. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला होता. मात्र, पात्रतेची पडताळणी सुरू केल्यानंतर लाभार्थी महिलांची संख्या घटली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी पात्र महिलांची संख्या आणखी कमी होणार आहे.