जळगाव समाचार | २५ फेब्रुवारी २०२५
कुसुंबा येथे सलग दुसऱ्या दिवशी अपघाताची घटना घडली असून, बस आणि रिक्षाच्या धडकेत भाजी विक्रेता महिलेचा मृत्यू झाला. तर, रिक्षा चालकासह एक जण जखमी झाला आहे.
मंगळवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी लोहारा (ता. पाचोरा) येथील रत्नाबाई गणेश हिवाळे (वय ४०) या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजी आणण्यासाठी रिक्षाने निघाल्या होत्या. कुसुंबा गावाजवळ विराज ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यामुळे रिक्षा पलटी झाली आणि रत्नाबाई बाहेर फेकल्या गेल्या. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात रिक्षाचालक बापू भास्कर चौधरी आणि गणेश बाबुलाल जाधव (वय २८, रा. रेठोड तांडा, ता. जामनेर) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रुग्णालयात धाव घेतली. कुटुंबीयांनी देखील आक्रोश व्यक्त केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे, याच भागात सोमवारी (२४ फेब्रुवारी) झालेल्या अपघातात एका वृद्ध पुजाऱ्याचा मृत्यू झाला होता. दोन दिवसांत दोन अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.