नाशिकमध्ये कुंभमेळा तयारीदरम्यान मोठी वृक्षतोड; नागरिकांचा संताप

 

जळगाव समाचार | १२ डिसेंबर २०२५

नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या विविध कामांसाठी महापालिकेने शहरातील विविध भागांत १२०० हून अधिक वृक्षांची तोड केल्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. तपोवन परिसरात सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीसाठी ४४७ पैकी ३२५ झाडे तोडण्यात आली, तर काही झाडांचे बुंधे मातीत गाडून व फांद्या नाल्यात टाकून पुरावे नष्ट केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तपोवनातील १८२५ झाडे वाचविण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी आंदोलन करत आहेत.

साधुग्राम उभारणीसाठी प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध असतानाच पालिकेने नोटीस संकेतस्थळावर न देता थेट कारवाई पुढे रेटल्याचा आक्षेप कार्यकर्त्यांनी नोंदवला. मात्र उद्यान विभाग प्रमुख विवेक भदाणे यांनी हे आरोप फेटाळले. त्यांनी सांगितले की हा तीन-चार महिन्यांपूर्वीचा विषय असून प्राप्त परवानगीनुसारच ३२५ झाडे तोडली गेली आणि उर्वरित झाडे वाचविण्यात आली. सांडपाणी केंद्रांसाठी एकूण १७०० झाडे तोडण्यास परवानगी मागण्यात आली होती, त्यातील सुमारे १२०० झाडे तोडली गेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गोदावरी शुध्दीकरण प्रकल्पांतर्गत शहरात काही नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी आणि जुन्या केंद्रांचे नुतनीकरण हे दीड हजार कोटींचे मोठे काम सुरू आहे. यात पंचक–चेहेडी येथील ८००, आगरटाकळीतील १५० आणि तपोवनातील ४४७ झाडे तोडण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने आधीच मंजुरी दिली होती. मात्र पर्यावरणप्रेमी देवांग जानी यांनी उद्यान विभागावर गंभीर आरोप करत, “हा विभाग व्यापारी झाला असून वृक्षतोडीतून काही मोजक्या वखारवाल्यांचेच हित साधले जात आहे,” असा आरोप केला.

दरम्यान उद्भवलेल्या रोषाला शांत करण्यासाठी प्रशासनाने हैदराबादहून १५ फूट उंचीची १५ हजार झाडे आणून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीची तयारी केली आहे. मात्र पर्यावरणप्रेमी व अभिनेते सयाजी शिंदे यांनी या दाखवूपूरत्या लागवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अगदी जवळजवळ खणलेल्या खड्ड्यांमध्ये रोपे लावल्याने त्यांचे जगणे अशक्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here