जळगाव समाचार डेस्क | २९ जानेवारी २०२४
प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे. बुधवारी मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो भाविक संगम घाटावर जमले होते. यामुळे घाटावर गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक भाविक जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जखमींना तातडीने ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व 13 अखाड्यांनी आजचे अमृत स्नान स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. साधू-संत त्यांच्या छावण्यांमध्ये परतले असून, त्यांनी सांगितले की अशा परिस्थितीत स्नानासाठी आल्यास व्यवस्थेत अडचणी येऊ शकतात. भाविकांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अखाडा परिषदेचे महामंत्री व जूना अखाड्याचे संरक्षक महंत हरि गिरि यांनी भाविकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “जिथे कुठे असाल तिथे गंगेत स्नान करून पुण्याचा लाभ घ्या आणि आपापल्या घरी परत जा.”
अखिल भारतीय अखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपुरी महाराज यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “आम्ही सर्व 13 अखाडे मौनी अमावस्येच्या स्नानासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही घटना अतिशय दुःखद आहे, त्यामुळे आम्ही वसंत पंचमीच्या अमृत स्नानाला सहभागी होऊ.”