जळगाव समाचार | २९ ऑगस्ट २०२५
तब्बल दोन वर्षांनंतर अखेर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला नवे नेतृत्व मिळाले असून, सभापतीपदी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) चे सुनील महाजन निवडून आले. तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गोकुळ चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वी सभापती श्यामकांत सोनवणे यांनी मुदत संपल्यानंतरही राजीनामा न दिल्याने १४ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानंतर नामुष्की टाळण्यासाठी सोनवणे यांनी दोन दिवस आधीच राजीनामा दिला होता.
महाजन यांना १५ मते, पाटील यांना अवघी दोन
शुक्रवारी पार पडलेल्या सभापती निवडणुकीत सुरुवातीला महाजन, मनोज चौधरी आणि लक्ष्मण पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र चौधरी यांनी माघार घेतल्यानंतर महाजन आणि पाटील यांच्यात थेट लढत झाली. हात वर करून मतदान घेण्यात आले असता, महाजन यांना तब्बल १५ मते मिळाली, तर पाटील यांना केवळ दोनच मते मिळाली. परिणामी निर्णय अधिकारी यांनी महाजन यांची सभापती म्हणून घोषणा केली. दरम्यान, उपसभापतीपदासाठी फक्त एकच अर्ज दाखल झाल्याने गोकुळ चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
सत्तांतरानंतर जल्लोष, महाजनांचा निर्धार
निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून, ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. माजी महापौर जयश्री महाजन यांचे पती असलेले सुनील महाजन हे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. निवडीनंतर महाजन यांनी “बाजार समितीच्या माध्यमातून वसुली वाढवून शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील,” अशी ग्वाही दिली. तसेच माजी मंत्री सुरेश जैन यांच्या कार्यकर्त्याला पुन्हा एकदा बाजार समितीच्या नेतृत्वाची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले.