किनगावात 81 वर्षीय वृद्धेचा बस अपघातात मृत्यू

0
55

जळगाव समाचार डेस्क| १३ सप्टेंबर २०२४

अहमदाबाद येथील ८१ वर्षीय वृद्ध महिला, कमलबाई रामराव अंडाईत, गुरुवारी सकाळी १० वाजता किनगाव येथे झालेल्या बस अपघातात गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडल्या. बऱ्हाणपूर-सुरत या एसटी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना त्या बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. या दुर्घटनेनंतर त्यांना तातडीने जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

रावेर आगाराची बऱ्हाणपूर-सुरत बस (क्रमांक MH 20 BL 3397) किनगाव येथील बसस्थानकात येताच प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. बसमध्ये बसण्याचा प्रयत्न करत असताना कमलबाई या मागील चाकाखाली सापडल्या आणि त्यांच्या दोन्ही पायावरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, पं.स.चे माजी सदस्य प्रशांत पाटील, काँग्रेसचे बशीर तडवी, पिना कोळी आणि रवींद्र ठाकूर यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिवहन मंडळाचे अधिकारी आणि यावल पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जळगाव येथील परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर, कामगार अधिकारी कमलेश भावसार आणि यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत प्रदान केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here