जळगाव समाचार | २ मे २०२५
चाळीसगाव तालुक्यातील वाघले गावातील गणेश ताराचंद राठोड (वय ४२) यांचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी तब्बल ४५ लाखांची खंडणी मागितली. अपहरणकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्या मुलास मारहाणीचे व्हिडीओ पाठवून मानसिक दबाव टाकला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या अचूक आणि वेगवान कारवाईमुळे केवळ १२ तासांत पिडीत व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली.
ही घटना दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी घडली. गणेश राठोड यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचा मुलगा अनिल राठोड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची जबाबदारी दिली.
स्थानीय गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि खबऱ्यांच्या मदतीने जयेश दत्तात्रय शिंदे (२८, सैनिक कॉलनी, चाळीसगाव) व श्रावण भागोरे (स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव) यांची नावे निष्पन्न केली. या आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना माहीती मिळाली की ते मनमाड रेल्वे स्टेशनकडे मोटारसायकलवरून जात आहेत.
पोलिसांनी पाठलाग करून दोन्ही आरोपींना शेतामधून ५ किलोमीटर धावपळीनंतर पकडले. चौकशीत त्यांनी अपहरणाची कबुली दिली. त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांनी राजू पाटील (रा. डोंबिवली) व सोनू (रा. मुंबई) यांच्या सांगण्यावरून हा कट रचला होता.
पिडीत गणेश राठोड यांना चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावाजवळील एका शेतशेडमध्ये डांबून ठेवून अत्याचार केला जात होता. खंडणीसाठी त्यांचे व्हिडीओ त्यांच्या मुलाला पाठवले जात होते. नंतर आरोपींनी त्यांना लासलगाव येथील जंगलात सोडले आणि तेथून फरार झाले.
पोलीस पथकाने जंगलात शोध घेतल्यानंतर गणेश राठोड हे जखमी अवस्थेत सापडले. त्यांना ताब्यात घेऊन उपचारासाठी हलवण्यात आले. या प्रकरणात पकडण्यात आलेले आरोपी वाचले नाहीत, तर उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
या धाडसी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह चंदेल, निरीक्षक बबन आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमोळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कामगिरी बजावली.
पथकात पोह. संदीप पाटील, मुरलीधर धनगर, महेश पाटील, सागर पाटील, भूषण शेलार, ईश्वर पाटील, जितेंद्र पाटील आणि दीपक चौधरी यांचा समावेश होता.