जळगाव समाचार | १८ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरातील एका मोबाईल साहित्य विक्रेत्याचे आणि त्यांच्या भाच्याचे २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्याने अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन प्रौढ आरोपींसह एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. फिर्यादी कृष्णकुमार डुंगराराम चौधरी (वय ३२), रा. जळगाव, हे मोबाईल साहित्याचे विक्रेते असून १५ फेब्रुवारी रोजी आरोपी यश जितेंद्र माकोडे (वय २२, रा. जळगाव) याने त्यांच्या भाचा गणपतलाल माली (वय १९) याला ममुराबाद रोडवरील एका घरात डांबून ठेवले.
त्यानंतर आरोपी यश माकोडे याने कृष्णकुमार चौधरी यांना स्वतःच्या मोटारसायकलवर बसवून अकोला येथे नेले. तेथे त्याचा साथीदार युवराज गणेश पवार (वय २४) याच्या मदतीने फिर्यादीस डांबून ठेवत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. आरोपींनी सुरुवातीला फिर्यादीकडून १५ हजार रुपये ‘गुगल पे’द्वारे स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतले. त्यानंतर गणपतलाल माली याला अकोल्यात डांबून ठेवून कृष्णकुमार चौधरी यांना २० लाख रुपये घेऊन जळगावला जाण्यास भाग पाडण्यात आले. जळगावला परतताच चौधरी यांनी तात्काळ शनिपेठ पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी तातडीने तपास सुरू केला. अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी समन्वय साधून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचे लोकेशन निश्चित करण्यात आले. जळगाव व अकोला पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अकोला येथील ताथोड नगर परिसरातील एका घरातून गणपतलाल माली याची सुखरूप सुटका केली. या कारवाईत यश जितेंद्र माकोडे, युवराज गणेश पवार आणि एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीरीत्या पार पडली असून संशयित आरोपींना पुढील कारवाईसाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

![]()




