जळगाव समाचार | ३१ जानेवारी २०२६
जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या वतीने “खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन – २०२६” या भव्य उपक्रमाचे आयोजन दि. ०१ ते ०५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक, जळगाव येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून, यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
खान्देशातील कृषी परंपरा, पशुधन संवर्धन, लोकसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीचे सर्वांगीण दर्शन घडविणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे. प्रदर्शनात आधुनिक कृषी अवजारे, कृषी निविष्ठा, नवीन तंत्रज्ञान, शासकीय योजनांची माहिती, पशुप्रदर्शन, महिला बचत गट व गृहउद्योगांच्या उत्पादनांचे विक्री-दालन उभारण्यात आले आहे. शेतकरी मार्गदर्शन सत्र, उद्योजकता विकास, महिला सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रम तसेच हस्तकला व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणारी मांडणी या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
प्रदर्शनाच्या कालावधीत दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये पोवाडा, लावणी, लोकनृत्य, लोकसंगीत, शाहिरी कार्यक्रम, कविसंमेलन व लोकनाट्य सादर होणार आहेत. यासोबतच अस्सल खान्देशी व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे. खान्देशच्या समृद्ध कृषी परंपरेचा, संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा जवळून परिचय करून देणाऱ्या या प्रदर्शनास जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

![]()




