खडसेंचा शिंदेंवर हल्लाबोल: ‘महायुतीचे उमेदवार कोणत्या पक्षाचे हे मुख्यमंत्र्यांना ठाऊक नाही!’

जळगाव समाचार डेस्क| २२ ऑक्टोबर २०२४

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन वेळा मुक्ताईनगरमध्ये येऊनही अजूनही संभ्रमात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्याचे आवाहन केले, मात्र तो उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे आणि कोणत्या चिन्हावर लढणार आहे, हे मुख्यमंत्र्यांना माहिती नाही, असे खडसे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

“मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा उमेदवार आहे की भाजपाचा, हे स्पष्ट केले पाहिजे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी उमेदवार अपक्ष असल्याचे सांगितले होते. मात्र, ते स्वतःच अजूनही संभ्रमात आहेत,” असे खडसे म्हणाले. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शरद पवार यांच्या पाठबळावर अपक्ष आमदार म्हणून विजयी झाल्याचा टोला लगावला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि महागाईवर भाष्य न केल्याबद्दलही खडसेंनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. “मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांचे पाढे वाचले, लाडक्या बहिणीचे कौतुक केले, मात्र वाढत्या महागाईबद्दल एक शब्दही काढला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्यावर त्यांनी काहीच भाष्य केले नाही,” असे खडसे म्हणाले.

त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी 5000 कोटी रुपयांची कामे केल्याचा दावा केला, मात्र ती कामे कुठे झाली हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. “ही रक्कम भ्रष्टाचारात तर नाही गेली ना, असे प्रश्न उपस्थित करत खडसेंनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात हिशोब मागितला. राज्यावर आठ लाख कोटींचे कर्ज असताना आणखी कर्ज काढून योजना जाहीर करणे म्हणजे फसवणूक आहे,” असे खडसे यांनी ठामपणे सांगितले.

महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे कोणतेही उत्तर नसल्याचा आरोप करत, खडसेंनी शेवटी मुख्यमंत्र्यांना यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे आणि त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा असे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here