जळगाव समाचार | १३ जून २०२५
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा माजी पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचे वयाच्या ५३व्या वर्षी निधन झाले. लंडनमधील गार्ड्स पोलो क्लबमध्ये पोलो सामना खेळत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. संजय कपूर यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे.
संजय कपूर यांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध लेखक आणि अभिनेता सुहेल सेठ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वरून दिली. त्यांनी लिहिले की, “संजय कपूर याच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःख झाले. आज सकाळी इंग्लंडमध्ये त्यांचे निधन झाले. हे खूप मोठे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि सोना कॉमस्टारमधील सहकाऱ्यांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. ओम शांती.”
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, संजय कपूर पोलो खेळत असताना त्यांना गुदमरल्यासारखे वाटले. त्यांनी खेळ थांबवण्याची विनंती केली आणि मैदानाबाहेर गेले. यावेळी त्यांनी मधमाशी गिळल्याने त्यांच्या घशात दंश झाला आणि त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
संजय कपूर हे भारतातील नामवंत उद्योगपतींपैकी एक होते. ते सोना कॉमस्टार या कंपनीचे चेअरमन होते आणि भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते. पोलो खेळाची त्यांना विशेष आवड होती. ते सोना पोलो संघाचे मालक होते आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळात सक्रिय सहभाग घेत असत.
संजय कपूर यांचे वैयक्तिक आयुष्यही अनेक वेळा चर्चेत राहिले आहे. त्यांनी २००३ साली बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्याशी लग्न केले होते. परंतु काही वर्षांतच त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण झाल्या. २०१४ साली करिश्मा कपूरने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि २०१६ साली दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले. त्यांना समायरा आणि कियान ही दोन अपत्ये आहेत. घटस्फोटाच्या खटल्यादरम्यान करिश्मा आणि संजय यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. अखेर मुलांचा ताबा करिश्माकडे देण्यात आला.
करिश्मा कपूरने तिची आई बबिता कपूर यांच्या इच्छेनुसार हे लग्न केले होते. मात्र तिचे वडील रणधीर कपूर यांना हे लग्न मान्य नव्हते. कालांतराने त्यांच्या नात्यात वाद वाढले आणि ते विभक्त झाले.
करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी संजय कपूर यांनी मॉडेल आणि उद्योजिका प्रिया सचदेव हिच्याशी लग्न केले. या जोडप्याला अजरियास कपूर नावाचा एक मुलगा आहे. दुसरीकडे, करिश्मा कपूरने मात्र दुसरे लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि ती सध्या आपल्या मुलांसोबत आयुष्य जगत आहे.
संजय कपूर यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह उद्योग आणि मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.