जळगाव समाचार डेस्क | २७ जानेवारी २०२५
कानळदा येथे अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या तरुणीने पाण्याच्या हौदात आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रियंका रवींद्र भंगाळे (वय 31, रा. कानळदा) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुण्यात नोकरी केली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी ती गावाला परतून आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी तिने घराच्या मागे असलेल्या हौदात झोपून आत्महत्या केली.
तिच्या काकांनी गोठ्याकडे गेल्यावर प्रियंका पाण्यात बुडालेली आढळून आली. तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिस पाटील नारायण पाटील यांच्या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक अनिल फेगडे आणि संजय भालेराव यांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.