जळगाव समाचार डेस्क | ९ सप्टेंबर २०२४
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे महर्षी कणवाश्रम परिसरात घडलेल्या घटनेत, ११ वर्षीय मुलाचा जीव वाचवणाऱ्या महिला कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ही घटना रविवारी, ८ सप्टेंबर रोजी सकाळी घडली.
गिरणा नदी पात्रात पूजेचे पैसे उचलण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाय घसरल्याने तो नदीत पडला. हे दृश्य पाहताच कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी तत्काळ आपल्या वर्दीवरच नदीत उडी घेत मुलाला सुखरूप बाहेर काढले. या धाडसी कृतीमुळे त्या परिसरात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.
महर्षी कणवाश्रम येथे ऋषीपंचमी निमित्त हजारो भाविकांची गर्दी जमली होती. महिला भाविक नदीत स्नान करून गुफेमध्ये पूजा करत असताना हा अपघात घडला. मुलाच्या बुडण्याचा आवाज ऐकून लोकांनी गोंधळ घातला, परंतु कॉन्स्टेबल पौर्णिमा यांनी शांतपणे आणि वेगाने कृती करून मुलाचा जीव वाचवला.
या साहसी कामगिरीबद्दल सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्या हस्ते कॉन्स्टेबल चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महर्षी कनवाश्रमाचे विश्वस्त, स्थानिक महिला भाविक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.