नाशिक, जळगाव समाचार डेस्क;
पंचवटी काळाराम मंदिर (kalaram mandir) परिसरात दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती आज सकाळ पासून तयार झाली होती. एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर राजवाडा परिसरात हिंदू युवा वहिनीच्या लेटर हेडवर प्रिंट करून पत्रके परिसरात वाटल्याने समाजाकडून तीव्र पडसाद उमटले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी आज शनिवारी सकाळी दि.22 रोजी राजवाड्यातील दीडशे ते दोनशे नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर मोर्चा काढून घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.
कोणीतरी संशयितांनी एका समाजाविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर प्रिंट केलेले पत्रक सार्वजनिकरित्या वाटप केले. या घटनेमुळे परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंदू युवा वाहिनीच्या शहराध्यक्षाचे सदर पत्रकात नाव असल्याने पंचवटी पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना ताब्यात घेतल्याचे समजते. पंचवटी भागात शहर पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, सदर पदाधिकाऱ्याचा आक्षेपार्ह मजकूर प्रकरणात सहभाग नसल्याचे पोलिसांनी तपासात निष्पन्न झाल्याचे म्हटले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी जाहिर प्रसिद्धी पथकान्वये दिली आहे. दरम्यान, आयुक्तालयाकडून सर्व नाशिककरांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्व समाजबांधवांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके आदींने केले आहे.
दरम्यान मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जुन्या वैयक्तिक वादामुळे हा प्रकार…
पोलिसांनी सांगितले कि, मुख्य संशयित आरोपी आणि संबंधित पदाधिकाऱ्याचे जुने वैयक्तिक वाद असल्यामुळे त्या व्यक्तीला त्रास व्हावा, या उद्देशाने आरोपीने त्याचे छायाचित्र असलेल्या लेटरहेडवर आक्षेपार्ह मजकूर छापून ती पत्रके वाटप केले.