सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांचे स्कूबा डायव्हिंग करताना निधन… गँगस्टर चित्रपटातील ‘या अली’ गाण्याने आले होते प्रकाशझोतात…

 

जळगाव समाचार | १९ सप्टेंबर २०२५

प्रसिद्ध बॉलीवूड गायक झुबीन गर्ग (वय ५२) यांचे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झालेल्या अपघातात निधन झाले. मूळचे आसामचे असलेले झुबीन २० व २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलसाठी सिंगापूरला गेले होते. फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करायच्या आधीच स्कूबा डायव्हिंगदरम्यान त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तत्काळ समुद्रातून बाहेर काढून सीपीआर देण्यात आला आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सर्व प्रयत्नांनंतर भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वाजता आयसीयूमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले.

झुबीन गर्ग यांनी हिंदी, बंगाली व आसामी भाषेत अनेक गाणी गायली असून २००६ मध्ये आलेल्या इमरान हाश्मीच्या गँगस्टर चित्रपटातील ‘या अली’ या गाण्यामुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वात हळहळ व्यक्त होत असून गायक झुबीन नौटियालसह अनेक कलावंतांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here