जळगाव समाचार | ८ ऑक्टोबर २०२५
झुंड चित्रपटात भूमिका साकारून प्रसिद्धीच्या झोतात आलेला प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्री मंगळवारी मध्यरात्री खुनाचा बळी ठरला. जरिपटका पोलिस हद्दीत नारा परिसरातील एका पडिक घरात मद्यपानाच्या नशेत त्याचाच मित्र ध्रुव साहू याने धारदार चाकूने गळा चिरून आणि दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र गुन्हे शोध पथकाने अवघ्या सहा तासांत त्याला अटक केली.
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघे मित्र नेहमीप्रमाणे दारू, गांजा आणि व्हाईटनरच्या नशेत गुंग होते. मध्यरात्री कसल्यातरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला. बाबूने चाकू काढताच ध्रुवने तो हिसकावून घेतला आणि बाबूवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबूचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करण्यात आला. मृतदेह सकाळी स्थानिकांना आढळून आला आणि पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
झुंड चित्रपटाद्वारे प्रसिद्धी मिळाल्यानंतरही बाबू छत्री गुन्हेगारी मार्गावरून परतला नाही. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल होते. फुटबॉलपटू म्हणून त्याची ओळख होती आणि त्याच कौशल्यामुळे नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड चित्रपटासाठी त्याची निवड झाली होती. परंतु चुकीच्या संगतीत पडून तो अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडला आणि चोरी व गुन्ह्यांच्या जगात ओढला गेला.