जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भारत सरकारच्या सहसचिवांची भेट कृषी कर्ज योजना व डिजिटायझेशन कामकाजाचा घेतला आढावा

 

जळगाव समाचार | २४ ऑगस्ट २०२५

भारत सरकारचे सहसचिव दिनेश कुमार जैन यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला भेट देऊन विविध योजनांचा आढावा घेतला. या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भेटीदरम्यान सहसचिवांनी बँकेच्या कृषी कर्ज पुरवठा योजनांची अंमलबजावणी, जिल्ह्यातील कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे संचालन व व्यवस्थापन पद्धती तसेच सुरू असलेल्या डिजिटायझेशन उपक्रमांची प्रगती याची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

या वेळी बँकेचे चेअरमन संजय पवार आणि कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व संचालक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते. सहकार क्षेत्रातील आव्हाने, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कार्यपद्धती अधिक पारदर्शक व गतिमान कशी होऊ शकते, यावरही विशेष भर देण्यात आला.

सहसचिवांच्या या भेटीमुळे जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल, तसेच कृषी आणि ग्रामीण विकासासाठी अधिक कार्यक्षम व सक्षम यंत्रणा उभारण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here