जळगाव क्रिकेट लीग 2026 पर्व 2 जाहीर; स्थानिक खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळणार…

 

जळगाव समाचार | २० मार्च २०२६

जळगाव शहरातील क्रिकेटप्रेमींसाठी उत्साहवर्धक बातमी समोर आली असून जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ‘जळगाव क्रिकेट लीग (JCL) 2026 – पर्व 2’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी ही घोषणा केली. या प्रसंगी अॅड. सुरज जहागिर, उपाध्यक्ष युसूफ मकरा, सचिव अरविंद देशपांडे आणि खजिनदार राजेंद्र लढ्ढा उपस्थित होते.

आयपीएलच्या धर्तीवर नियमावली तयार करून ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून मेहरुण परिसरातील कांताई नगर येथील ‘जैन ड्रीम स्पेसेस’च्या क्रीडांगणावर सामने रंगणार आहेत. टी-२० स्वरूपातील या स्पर्धेमुळे जळगाव शहरात पुन्हा एकदा क्रिकेटचा जल्लोष अनुभवायला मिळणार असून स्थानिक पातळीवर व्यावसायिक क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे.

‘Own The Game, Lead The League, Build Legacy’ या घोषवाक्याखाली होणारी ही स्पर्धा जळगावसह संपूर्ण कान्हदेशातील उदयोन्मुख खेळाडूंना स्वतःची प्रतिभा सिद्ध करण्याची संधी देणार आहे. पांढऱ्या लेदर बॉलवर रंगीत कपड्यांमध्ये खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत दिवस-रात्र सामने आयोजित केले जाणार असून त्यामुळे स्पर्धेची आकर्षकता अधिक वाढणार आहे.

या लीगचा मुख्य उद्देश स्थानिक क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला वाव देणे आणि जळगाव जिल्ह्यातील क्रिकेटचा दर्जा उंचावणे हा असल्याचे अध्यक्ष अतुल जैन यांनी स्पष्ट केले. जळगाव क्रिकेट लीग ही केवळ एक स्पर्धा नसून ती जळगावकरांसाठी क्रिकेटचा उत्सव ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या या उपक्रमामुळे कान्हदेशातील खेळाडूंना मोठ्या पातळीवर खेळण्याची संधी मिळणार असून जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा!

“नवा जोश, नव्या थरारासह जळगाव क्रिकेट T20लीग तयार! खेळाची ताकद, जळगावची शान म्हणून याकडे बघितलं जाते. जळगाव व कान्हदेशातील क्रिकेटपटूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी आणि स्थानिक खेळाडूंना चालना मिळावी, या उद्देशाने जळगाव क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. मैदानावर दमदार खेळाचे प्रदर्शन होईल आणि जळगावचा गौरव वाढेल. व जळगावकरांना मिळणार आता मौका… जळगाव क्रिकेट लीगचा खेळाडूंसाठी खेळाचा, व्यावसायिकांसाठी व्यवसायाचा मौका… या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन ने जाहीर केलेल्या खेळाडूंनाच त्यांनी नोंदणी केल्यानंतर खेळता येईल असेही संघटने तर्फे नमूद करण्यात आले आहे

— अतुल जैन, अध्यक्ष जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here